Ind vs Aus 1st Test : पर्थवर रंगलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय फलंदाजांचा जलवा बघायला मिळाला. आधी यशस्वी जैस्वाल तर नंतर विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपलेली बघायला मिळाली. अनेक महिन्यांपासून ऑऊट ऑफ फॉर्म असलेल्या विराट कोहलीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत खणखणीत शतक ठोकत जबरदस्त कमबॅक केलं आहे. तब्बल 16 महिन्यानंतर विराटच्या बॅटीतून हे शतक आलं आहे. या शतकाने टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेट ऑस्ट्रेलियाची चांगलीच भंबेरी उडाली आहे. भारत दुसऱ्या डावात मजबूत स्थितीत असून ऑस्ट्रेलिया मात्र दुसऱ्या डावात 12 रन्स करत 3 विकेट गमावून बसली आहे. त्यामुळे आस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत दिसत आहे.
केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 201 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया मजबूत स्थितीत आली. यशस्वी जयस्वालने 297 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या. तर केएल राहुलने 176 चेंडूंचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या टेस्ट सामन्यातून विराट कोहलीने दणदणीत शतक ठोकलं आहे. विराट कोहलीने 143 बॉलचा सामना करत हे शतक ठोकलं आहे. या शतका दरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार टोलवले आहेत. या शतकानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या दिशेने फ्लाईंग किस देत, हे शतक साजरं केलं आहे. या शतकानंतर आता भारताच्या दुसऱ्या धावांची आघाडी वाढली आहे. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया समोर 534 धावांच आव्हान उभं केलं आहे.
दरम्यान विराटच्या या शतकानंतर टीम इंडियाने त्यांचा दुसरा डाव घोषित केला आहे. टीम इंडियाने 6 विकेट 487 धावांवर डाव घोषित केला. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 534 धावांची आघाडी घेतली आहे. या धावांचा पाठलाग करताना सिराज आणि बुमहराने ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 धावा करत 3 विकेट्स गमावल्या आहेत. त्यानंतर आजचा खेळ थांबवण्यात आला आहे.