Tim Southee : नुकतंच न्यूझीलंडने टीम इंडियाला 3-0 असा व्हाईटवॉश दिला. या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. WTC ची फायनल गाठणं न्यूझीलंडसाठी काहीसं सोप असणार असं म्हटलं जात असतानाच किवींच्या सर्वोत्तम आणि वरिष्ठ गोलंदाजाने निवृत्ती जाहीर केली आहे.
न्यूझीलंडचा माजी टेस्ट कॅप्टन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. टीम साऊदी न्यूझीलंडसाठी दुसरा सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. २८ नोव्हेंबरनंतर सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या टेस्ट सिरीजनंतर तो क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. १४ ने १८ डिसेंबरदरम्यान होणारा सिरीजमधील अंतिम सामना टीम साऊदीचा शेवटचा टेस्ट सामना असणार आहे.
टीम साऊदीने मार्च 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट डेब्यू केला होता. आतापर्यंत त्याने प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 104 सामने खेळले असून 385 विकेट्स मिळवल्या आहेत. न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे रिचर्ड हॅडली (३८५) आहे. त्याने न्यूझीलंडकडून 161 वनडे आणि 126 टी-20 सामने खेळले असून, त्याने अनुक्रमे 221 आणि 164 विकेट्स घेतल्या आहेत.
नेमकं काय म्हणाला टीम साऊदी?
सौदी म्हणाला, “टेस्ट क्रिकेटला माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. इंग्लंडविरुद्ध एवढी मोठी सिरीज खेळल्यानंतर निवृत्ती घेणं हा सर्वोत्तम वेळ आहे. माझ्या टेस्ट कारकिर्दीला इंग्लंडविरुद्ध सुरुवात झाली. तिन्ही मैदानं माझ्यासाठी खूप खास आहेत. माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक, आमचे चाहते आणि या खेळाशी निगडित प्रत्येकाचा मी सदैव ऋणी राहीन. माझ्यासाठी हा खूप सुंदर प्रवास होता आणि तो तसाच राहील.”