मुंबई : एका कुख्यात आंतरराष्ट्रीय फिक्सरने बनावट कंपन्यांच्या माध्यमातून ५ भारतीय क्लबमध्ये गुंतवणूक केली असून याची कुणकुण लागताच हे पाचही क्लब सध्या सीबीआयच्या रडारवर आले आहेत.
मागील आठवड्यात सीबीआयच्या एका पथकाने नवी दिल्ली येथील अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या कार्यालयास भेट देत या क्लबबद्दल व त्याच्या गुंतवणुकीबाबत अधिक माहिती घेतल्याचे समोर आले आहे.
सिंगापूर स्थित आंतरराष्ट्रीय मॅच फिक्सरने कंपनीमार्फत भारतीय फुटबॉलमध्ये गुंतवणूक केल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. १९९५ साली फिक्सींगच्या आरोपाखाली आरोपीला तुरुंगवास भोगावा लागला आहे.
तसेच फिनलँड आणि हंगेरी या दोन देशांतही त्याच्याविरोधात फिक्सींगचे आरोप सिद्ध झाले आहेत.
त्यामुळेच सीबीआयने आपल्या रडारवर आलेल्या पाचही फुटबॉल क्लबना पत्र लिहून, त्यांचे करारनामे, स्पॉन्सरशीप आणि परदेशी खेळाडूंसह सपोर्ट स्टाफची नेमणुक करताना नेमलेल्या एजन्सीची सर्व माहिती मागवली असून हे पाचही फुटबॉल क्लब AIFF च्या I-League स्पर्धेत खेळणारे क्लब आहेत.
फुटबॉल महासंघाची फिक्सींगविरुद्ध कठोर भूमिका असून पाचही क्लबना सीबीआयला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून फुटबॉल क्लबमध्ये गुंतवणूक झाल्याची बाब समोर येत आहे.
त्यामुळे भारतीय फुटबॉलचा फिक्सर्सशी कोणताही संबंध नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करु अशी प्रतिक्रीया फुटबॉल महासंघाचे सेक्रेटरी जनरल एस. प्रभाकरन यांनी दिली.