नवी दिल्ली: प्रशांत महासागर क्षेत्रातील समोआ संघाचा फलंदाज डेरियस विसेरने टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेऱ्यांतील लढतीत एकाच षटकात ३९ धावांची लयलूट करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. इतिहासात याअगोदर पाच वेळा एका षटकात ३६ धावा काढण्याची नोंद झाली आहे.
समोआ संघाचा मधल्या फळीतील फलंदाज विसेरने प्रतिस्पर्धी वनातु संघाचा गोलंदाज नलिन निपिकोला एकाच पटकात सहा षटकार मारले. यामध्ये तीन नो बॉलचा समावेश आहे. यामुळे टी-२० विश्वचषकात एकाच षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम विसेरनच्या नावावर जमा झाला. विसेरने ६२ चेंडूंत ५ चौकार आणि १४ षटकारांसह १३२ धावांची झुंजार खेळी उभारली. मात्र, तरीही समोआ संघाचा डाव १८५ धावांत आटोपला. विसेरनंतर कर्णधार कालेब जसमतला १६ धावा काढता आल्या. उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. वनातु संघाला आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा डाव १७५ धावांत आटोपला. यामुळे समोआ संघ १० धावांनी विजयी ठरला.
एकाच षटकात सर्वाधिक धावा देण्याच्या नामुष्कीजनक विक्रम पाच गोलंदाजांच्या नावावर आहे. इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड या पंक्तीत पहिल्या स्थानवर येतो. त्यानंतर श्रीलंकेचा अकिला धनंजया (२०२१), अफगाणिस्तानचा करीम जन्नत (२०२४), कामरान खान (२०२४) आणि अफगाणिस्तानचा अजमतुल्लाह उमरजई (२०२४) यांचा क्रमांक लागतो.
२००७ मधील पहिल्या टी-२० विश्वचषकात युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले होते, तर वेस्ट इंडीजचा फलंदाज केरॉन पोलार्डने द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयविरुद्ध अशीच कामगिरी केली होती. नेपाळच्या दीपेंद्र सिंग अरीने एसीसी प्रीमियर कपमध्ये कामरान खानच्या चेंडूवर सहा षटकार ठोकले, तर वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरनने या वर्षी जूनमध्ये टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज अजमतुल्ला ओमरझाईच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकले होते. रोहित शर्मा आणि रिकू सिंग यांनी बंगळुरूमध्ये द्विपक्षीय मालिकेत अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज करीम जनातच्या एका षटकात मिळून ३६ धावांची बरसात केली होती.