पुणे : पावसामुळे रोमांचकस्थितीत आलेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५ धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे तिकिट फिक्स केले आहे. भारताने ठेवलेल्या १८५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने धडाकेबाज सुरूवात केली होती.
पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशसमोर १६ षटकात विजयासाठी १५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मात्र बांगलादेशला १६ षटकात १४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून हार्दिक पांड्याने २ तर अर्शदीप सिंगने २ विकेट घेतल्या.
भारताने ठेवलेल्या १८५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने धडाकेबाज सुरूवात केली. सलामीवीर लिटन दासने भारताच्या गोलंदाजींच्या चिंधड्या उडवून देत संघाला ७ षटकात ६६ धावांपर्यंत पोहचवले. यात लिटन दासच्या एकट्याचे नाबाद ५९ धावांचे योगदान आहे. दुसरा सलामीवीर नजिमुल हुसैन शांतोने १६ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या आहेत. दरम्यान, सात षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळे सामना थांबवावा लागला.
खेळ सुरू झाल्या झाल्या केएल राहुलने धोकादायक लिटन दासला ६० धावांवर धावबाद केले. लिटन दास बाद झाल्यानंतर मोहम्मद शमीने दुसरा सलामीवीर नजमुल हुसैने शांतोला २१ धावांवर बाद करत बांगलादेशला दुसरा धक्का दिला. बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर कर्णधार शाकिबने धुरा खांद्यावर घेत सामना ३० चेंडूत ५४ धावा करायच्या होत्या.
मात्र अर्शदीपने अफिफ हुसैनला ३ धावांवर बाद करत बांगलादेशला तिसरा धक्का दिला. याच षटकात अर्शदीपने कर्णधार शाकिबला १३ धावांवर बाद करत बांगलादेशला मोठा हादरा दिला. पाठोपाठ हार्दिक पांड्याने चौधरीला बाद करत बांगलादेशचा पाचवा फलंदाज माघारी धाडला. याचबरोबर मोसादकला देखील याच षकात बाद करत सामना १८ चेंडूत ४३ धावा हव्या होत्या.
बांगलादेशविरूद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक ही भारताची मोठमोठी नावं आपल्या लैकिकास साजेसा खेळ करू शकली नाही. अखेर भारताची ‘रनमशिन’ पुन्हा एकदा भारतासाठी उभी राहिली. विराट कोहलीने ४४ चेंडूत नाबाद ६४ धावांची खेळी करत भारताला १८४ धावांपर्यंत पोहचवले.