यवत : यवत स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. नांदूर येथील फील्डगार्ड कंपनी आणि लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्याकडून स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन युवा नेते किरण यादव व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सध्या सर्वत्र थंडी, ताप, सर्दी, खोकला, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरीया यांसारख्या साथीच्या आजारांची साथ आहे. साथीच्या आजारामुळे मुलांचे शाळेतील हजेरीच्या प्रमाणात घट झाली होती. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
यवत स्टेशन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नांदूर येथील फील्डगार्ड कंपनी यांच्या सौजन्याने विश्वराज हॉस्पिटल यांच्याकडून ८६ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात वजन, उंची, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी यांसह विविध तपासण्या बालरोग तज्ज्ञ यांनी केल्या.
या शिबिरासाठी फील्डगार्ड कंपनीच्या प्रियांका चव्हाण, विश्वराज हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. धीरजा यांसह कंपनीचे व हॉस्पिटलचे सहकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
यावेळी डॉ. धीरजा यांनी यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. त्याशिवाय किरण यादव यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या शिबिराचे कौतुक केले. तर शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री रायकर यांनी फील्डगार्ड कंपनीचे व विश्वराज हॉस्पिटल यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपाली थोरात, मुख्याध्यापिका जयश्री रायकर, शिक्षक अनिल हुंबे, रामहरी लावंड, अमोल राजपुरे, महेश यादव यांसह शाळेचे शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.