लोणी काळभोर, ता. 20 : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024-2025 अंतर्गत आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत कदमवकवस्ती (ता. हवेली) येथील कदमवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. कदमवस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य व कविता गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात शाळेने पहिल्यांदाच हवेली तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यामुळे विजेत्या विद्यार्थ्यांचे व शाळेचे लोणी काळभोर सह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
लोणीकंद (ता. हवेली) येथे तालुकास्तरीय स्पर्धा गुरुवारी (ता. 19) पार पडल्या. या स्पर्धेत हवेली तालुक्यातील उरुळी कांचन, लोणी काळभोर, लोणी कंद, वाघोली, खेडशिवापूर व खडकवासला या सहा बिटांमध्ये असलेल्या 235 शाळांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी मैदानी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या अनेक स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत कदमवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कदमवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य प्रकारात विद्यार्थ्यांनी ‘उदे गं अंबे’या गाण्याच्या माध्यमातून गोंधळ घालून देवीला साकडे घातले. आणि हाच गोंधळ हवेली तालुक्यात प्रथम ठरला आहे. तर कविता गायन स्पर्धेतही शाळेने अजिंक्यपद पटकाविले आहे. या स्पर्धेतील बेडूक उडी प्रकारात दिव्या सुरनर या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर उंच उडी मध्ये पुष्कर कागदे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तर या स्पर्धेतील खेळांमध्ये कदमवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेने चमकदार कामगिरी केली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना लोणी काळभोर केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, कदमवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी जगधने, नवनाथ पानमंद, नजमा तांबोळी, सीमा साबळे, महेश पवार, सचिन कराड, प्रियांका लामतुरे, सोनाली खंडाळे यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले आहे. प्रथम क्रमांक मिळविलेल्या संघांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. यंदा शाळेने पहिल्यांदाच तालुकास्तरीय स्पर्धेत बाजी मारली असून शाळेचे विद्यार्थी जिल्हास्तरीय स्पर्धा खेळणार आहेत. त्यामुळे शाळेच्या शिक्षकांचे व विजेत्या विद्यार्थ्यांचे लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
दरम्यान, तारमळा -थेऊर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी संयुक्ता विजय कोळेकर हीने 50 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. संयुक्ताची जिल्हास्तरीय धावणे स्पर्धेत निवड झाली आहे. संयुक्ताचे थेऊर सह परिसरात भरभरून कौतुक होत आहे. या यशासाठी संयुक्ताला मुख्याध्यापिका सरिता परदेसी यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे
1) लोकनृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक
आरोही कुसाळकर, अंजली साबळे, श्रावणी धांडे, ज्ञानेश्वरी खेडकर, प्रतिज्ञा शिंदे, समाइरा शेख, समृद्धी दोडके, स्वरा चव्हाण, आराध्या सावंत, आदिती मोहिते
2) कविता गायन – प्रथम क्रमांक (इयत्ता दुसरीतील मुली)
रिया सुदर्शन कागदे, दिव्या दिपक सुरनर, माहेश्वरी संजय धायगुडे, शेजल विशाल उबाळे, शनाया सुनील साबळे, शर्वरी पवनकुमार बनसोडे, वेदिका परमेश्वर गायकवाड, प्रणाली सदानंद लेमाडे, केतकी राहुल शिंदे, दुर्वा राहुल मेरे