पुणे : पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आता एरंडवणे भागात आणखी एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या आता 16 पर्यंत पोहोचली आहे. पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.
पुण्यात अगदी वेगाने झिका व्हायरसचा प्रसार होत आहे. त्यामुळे पुणेकर आणि आरोग्या विभागाची चिंता वाढली आहे. झिकाचा प्रसार रोखण्यासाठी पुण्यात आरोग्य सर्वेक्षण सुरु झालं आहे. झिका व्हायरचा सर्वाधिक धोका गर्भवती महिलांना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं गर्भवती महिलांच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला आहे.
झिका व्हायरसची लागण कशी होते?
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. तसेच एडीस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो. हा रोग एडिस डासाच्या चावण्यानं पसरतो. हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात. या व्हायरसमुळे होणारा संसर्ग अनेकदा रुग्णाच्या जीवाला धोका पसरवू शकतो. त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा.
झिका व्हायरसची लक्षणं कोणती?
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे ताप, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे आढळतात.
अशी घ्या काळजी
– सर्व पाण्याच्या टाक्या आणि कंटेनरवर घट्ट झाकण ठेवा
– मच्छरदाणीखाली झोपा
– तुमच्या त्वचेवर सुरक्षित कीटकनाशकांचा वापर करा
– डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लांब आणि सैल कपडे घाला
– झिका विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या प्रदेशात प्रवास करणे टाळा
– डासांची उत्पत्ती होण्यासाठी पावसाचे पाणी साचू देऊ नका