पुणे : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालं असताना आता पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे राज्यभरात एकच संतापाची लाट उसळली आहे. आता पुण्यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, बदलापूर घटनेनंतर तब्बल 12 अशा घटना राज्यात घडल्या असून स्त्री शक्तीचा महिमा सांगणारा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. याच पहिल्या दिवशी अशी घटना घडते. माझ्या गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचा आवाहन किंवा विनंती करावीशी वाटत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आता लेकीबाळी तुझ्याच भरोशावर..: सुषमा अंधारे
गृहमंत्र्यांचा राजीनामा सुद्धा मागावा असे वाटत नाही. कारण पंधरा-वीस दिवस बाकी आहेत. अंबाबाईला प्रार्थना करते की, आता लेकीबाळी या तुझ्याच भरोशावर आहेत. राज्य सरकार तुझ्या लेकीबाळीला अजिबात सुरक्षा देऊ शकत नाही, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या पुढे म्हणाल्या की, काही बसेस स्कूलकडून असतात तर काही खाजगी असतात. खाजगी बसेसचा खर्च हजार पाचशे रुपये कमी असतो. त्यामुळे बचत करण्याच्या नादात खाजगी बसेसचा पर्याय अनेक जण निवडत असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना सोडताना लेडीज स्टाफ नसतो. बसेस खाजगी असल्यामुळे पालक फारसे बोलत नाहीत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
नेमकी घटना काय?
स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबतची सर्व माहिती आपल्या पालकांना दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.