नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ‘मॅक्स केअर हॉस्पिटल’मधील वॉर्ड बॉयने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमीन कोमिल सिंग(वय १९, रा. शहाबाद, उत्तर प्रदेश) असं विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. प्रेमभंगातून ही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे, अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाबाद येथील सोमीन कोमिल सिंग हा तरुण येथील कोल्हेमळा रस्त्यालगत असलेल्या ‘मॅक्स केअर हॉस्पिटल’मध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. तो हॉस्पिटलमध्येच निवासी होता. त्याचे शहाबाद येथील एका तरुणीवर प्रेम जडले होते. काही दिवसांपूर्वी त्या तरुणीने आत्महत्या केली आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी विष प्राशन करून सोमीन कोमिल सिंग याने हॉस्पिटलमधील खोलीमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलिस करत आहेत.