शिक्रापूर: येथे एका युवकाची एटीएममध्ये आलेल्या एका अनोळखी इसमाने पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन एटीएम बदलून फसवणूक करत तब्बल एकोणचाळीस हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौक येथे जयेश फणसे हा युवक एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला असताना एटीएममध्ये हजर असलेल्या इसमाने मी पैसे काढून देतो, असे म्हणून जयेश याचे एटीएम हातचलाखीने बदलून निघून गेला. त्यानंतर काही वेळाने जयेश याच्या एटीएममधून एकोणचाळीस हजार रुपये काढून घेतल्याचा मोबाईलवर मेसेज आला. त्यानंतर घडलेला प्रकार जयेश याच्या लक्षात आला. याबाबत जयेश परमेश्वर फणसे (वय १७ रा. जातेगाव बुद्रुक) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे हे करत आहे.