पुणे : पुण्यात गुंडगिरी थांबण्याच नाव घेता घेईना. शहरातील ताडीवाला रोडवर येऊन युवकावर कोयत्याने वार करुन जखमी करुन दहशत माजवण्याचा तडीपार असलेल्या गुंडाने केला आहे. याप्रकरणी आर्यन लॉरेन्स पिल्ले (वय १८, रा. ताडीवाला रोड) याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून बंडगार्डन पोलिसांनी अजय ऊर्फ हॅलो लक्ष्मण कांबळे (वय २१, रा. ताडीवाला रोड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अजय कांबळे याला पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी ६ नोव्हेबर २०२३ रोजी २ वर्षांकरीता पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असं असतानाही कांबळे हा ताडीवाला रोडवर सतत येत असतो. दरम्यान, फिर्यादी आणि त्याचा गुरुजी हे रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन जात होते. त्यावेळी कांबळे याने त्यांना गाडी थांबविण्यास सांगितली.
कारे तुला मस्ती आली काय, तुझा बाप आता जेलमध्ये आहे. आज मी तुला बघतोच आणि तुझ्या बहिणीला पण दाखवतो, हॅलो काय आहे ते आता फक्त मी ताडीवाल्याचा भाई आहे, बघतोच कोण मध्ये येतो, असं म्हणून शिवीगाळ करुन कोयता फिर्यादीच्या कपाळावर मारुन जखमी केले. दोघे पळून गेल्यावर त्यांचा पाठलाग करुन हातातील कोयता हवेत फिरवून मी इथला भाई आहे बघतोच आज तुला वाचवायला कोण येतो, असं म्हणत परिसरात दहशत पसरविली. सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम तपास करत आहेत.