पुणे : शहरातील टिळक रस्त्यावर दिवाळी खरेदीसाठी आलेल्या तरुणावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच कोयता गँगने पुन्हा एकदा शहरात दहशत माजवली आहे. मार्केट यार्ड परिसरात फटाके फोडण्यावरुन तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुमार राम कांबळे (वय-२०, रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फय्युम फिरोज खान (वय-२०), शाहरुख सलीम खान (वय-२१), साहील (सर्व रा. आंबेडकर नगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (ता. १२) रात्री अकराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गल्ली क्रमांक ११ येथे घडला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार कांबळे व त्याचा मित्र प्रथमेश दोघे दिवाळीनिमित्त गिरधरे यांच्या दुकानासमोर फटाके फोडत होते. त्याचवेळी आरोपी तेथे आले आणि अरेरावी करण्यास सुरवात केली. येथे फटाके फोडायचे नाहीत, असे सांगून, फटाके फोडण्यास मज्जाव केला. वाद घालून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या कोयत्याने प्रथमेश याच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी हवेत कोयते नाचवून परिसरात दहशत माजवली.
कोयता गॅंगचा बिमोड करण्यासाटी पुणे शहर व ग्रामीण पोलीस पुरेशी खबरदारी घेत आहेत. मात्र, ही दहशत अजून संपलेली नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.