पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात ताट धुण्यास सांगितल्याने तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. रोजा सोडण्यासाठी जेवणाचे ताट धुण्यास सांगितले म्हणून एका तरुणाला सोडा बॉटल आणि धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह तिघांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार 22 मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास कॅनरा बँकेच्या समोरील दुचाकी पार्किंग मध्ये घडला आहे.
यबाबत अल्तमश इरफान सय्यद (वय-18 रा. मिठानगर, कोंढवा) याने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन उमेर आसिफ खान उर्फ मेंढा याला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी खान आणि फिर्यादी सय्यद एकमेकांच्या परिचयाचे आहेत. फिर्यादी यांनी आरोपीला रोजे सोडण्यासाठी जेवणाचे ताट धुण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्य़ादी आणि त्यांच्या भाऊ व मित्राला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी तरुणाला सोडा बॉटल आणि धारदार हत्याराने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना सी.आर.पी.सी 41(अ)(1) प्रमाणे नोटीस बजावली असून एकाला अटक केली आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.