पुणे : अहिल्यागर-पुणे रस्त्यावरील टाटा गार्डन परिसरात गुरुवारी (दि. १७) रात्री बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तिघांनी डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन तरुणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या मुलाला अटक करण्यात आली. प्रदीप बाबासाहेब अडागळे (वय २२, रा. आव्हाळवाडी, वाघोली) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी ऋषी काकडे आणि त्याची आई सुनीता काकडे (रा. थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
काकडे यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. प्रदीप अडागळे आणि ऋषी काकडे यांच्यात बहिणीची छेड काढल्यावरुन गेल्या वर्षभरापासून वाद सुरू होते. दुचाकीने हूल दिल्याने गुरुवारी एका अल्पवयीन मुलाशी अडागळे याची भांडणे झाली होती. त्या वादातून चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ प्रदीप अडागळे याला बोलविले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीप अडागळे याच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत प्रदीप याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ससून रुग्णालयात त्याचा मृत्यु झाला.