वडगाव मावळ: भावाला मारहाण केल्याच्या रागातून युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंदर मावळ येथील कुसूर गाव परिसरात कामा फार्म येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय बाबाजी जगताप (वय २६, रा. चंदननगर, पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी आरोपी अशोक तुरडे, मोहन तुरडे, सुभाष तुरडे सह अन्य ५ ते ७ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास अक्षय जगताप आणि अंकुश तुरडे यांच्यात सुरूवातीला बाचाबाची झाली होती. या दरम्यान अक्षय याने अंकुश तुरडे याच्या नाकावर बुक्की मारली, यात अंकुश जखमी झाला होता. जखमी केल्याच्या कारणावरून आरोपींनी मिळून लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व लोखंडी सळ्या यांच्या साहाय्याने हत्या केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डोईजड करीत आहेत.