पुणे: गुन्ह्यात गोवल्याने दोन तरुणांनी एकाचा गजाने बेदम मारहाण करून खून केल्याचा प्रकार शनिवारी (दि. २०) उघडकीस आला. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह रेल्वेरुळावर टाकून दिला होता. या प्रकारानंतर आरोपींनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.
फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय ३३, रा. रामटेकडी, हडपसर) हे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धेश्वर दिलीप चव्हाण, भैय्या उर्फ प्रसाद विजय कांबळे (दोघे रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी चव्हाण सराईत गुन्हेगार आहे. फराहान शेख वेल्डिंगचे काम करायचा. त्याची चव्हाण याच्याशी ओळख होती. वर्षभरापूर्वी चव्हाणविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात तो कारागृहात होता, फरहानमुळे गुन्हा दाखल झाल्याचा राग त्याच्या मनात होता. दोन महिन्यांपूर्वी तो जामिनावर मुक्त झाला होता. त्यावेळी त्याने फरहानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. फरहानने या घटनेची माहिती भाऊ फरीदला दिली होती.
चव्हाण आणि त्याचा साथीदार प्रसादने शनिवारी मध्यरात्री फरहानला रामटेकडी परिसरात दारू पिण्यास नेले. तेथे त्याला गजाने बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या फरहानचा मृत्यू झाला. त्यानंतर फरहानचा मृतदेह रेल्वेरुळावर टाकून दोघेजण पसार झाले. रेल्वेगाडी गेल्यानंतर फराहनचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. त्यानंतर, आरोपी चव्हाण आणि प्रसाद मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हा प्रकार हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने वानवडी पोलिसांनी या घटनेची माहिती हडपसर पोलीस ठाण्यात दिली. फरहानचा भाऊ फरीदला या घटनेची माहिती देण्यात आल्याने फरीदने मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर दोघा आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली.