पुणे : हिट अँड रन प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेल्या कल्याणीनगर परिसरात शनिवारी (दि. १) रात्री नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणाकडून पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
इन्स्टाग्रामच्या काही अकाउंटसमधून हा व्हिडिओ प्रसारित झाला. त्यानंतर, नगर रस्ता परिसरातील काही व्हॉट्सअप ग्रुपमधून हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याबाबत सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.
कल्याणीनगरमधील हिट अँड रन प्रकरण सर्व स्तरांत गाजल्यानंतर पोलिसांनी पब असलेल्या भागांसह संपूर्ण शहरात दररोज नाकाबंदी केली जात आहे. त्यानुसार, रात्री दहानंतर सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाते. कागदपत्रांची पाहणी, तसेच चालक मद्याच्या नशेत आहे किंवा कसे? याची तपासणी केली जाते. कल्याणीनगर परिसरात पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करीत होते. त्या वेळी, एका कारमधून सणसवाडीचे काही तरुण चालले होते. पोलिसांनी त्यांची चौकशी केली. गाडीची कागदपत्रे नसल्याने त्यांनी कारचालकाला दंड केला. त्यानंतर, पोलिसांचे पथक एका युवकाला घेऊन जवळच खुर्चीवर विराजमान झालेल्या अधिकाऱ्याकडे गेले.
#WATCH | #Pune: Cop Makes Youth Massage His Legs In Kalyani Nagar; Video Goes Viral#maharashtra #punenews pic.twitter.com/irSRWZkn86
— Free Press Journal (@fpjindia) June 2, 2024
या अधिकाऱ्याने या युवकाची कानउघाडणी केली. तसेच त्याला पाय चेपायला सांगितले. नाइलाज झालेल्या या युवकाने गुमानपणे साहेबांची सेवा केली. त्यानंतर, थोड्या वेळाने पोलिसांनी त्याची सुटका केली. दरम्यान, या रस्त्यावरून चाललेले नागरिक हा प्रकार पाहून चकित झाले. त्यापैकी एकाने या प्रकाराचे मोबाईलमधून चित्रीकरण केले. त्यानंतर रातोरात ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याबाबत अनेक नागरिकांनी संतापाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.