शिक्रापूर : येथील एका युवकाला बाथरूममध्ये सर्पदंश झाला. त्यानंतर सर्पमित्रांनी धडपड करून शिताफीने सापाला पकडून जीवदान दिले. मात्र, तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या युवकावर डॉक्टरांनी सर्पमित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपचार केले. त्यामुळे युवकाचे आणि सापाचे प्राण वाचले आहेत.
सासवडे कॉम्प्लेक्समध्ये आकाश खरात या युवकाला बाथरूममधून बाहेर पडताना सापाने दंश केला आणि साप फरशीखाली गेला. दरम्यान नागरिकांनी आकाशला उपचारासाठी शिरुर येथील हॉस्पिटलमध्ये नेले. याबाबतची माहिती सर्पमित्रांना दिली. त्यांनतर निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शेरखान
शेख, नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष गणेश टिळेकर, सर्पमित्र अमोल कुसाळकर, शुभम वाघ यांनी सदर ठिकाणी धाव घेत पप्पू नायकोडी, गौरव पोकळे यांसह आदी युवकांच्या उपस्थितीत फरशी खालील सापाला बाहेर काढले.
सदर साप कवड्या जातीचा बिनविषारी साप असल्याचे समोर आले. सर्पमित्रांनी याबाबतची सर्व माहिती आकाशला दाखल केलेल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना दिल्याने डॉक्टरांसह सदर युवक आणि त्याच्या मित्रांना धीर आला. त्यामुळे डॉक्टरांनी देखील प्राथमिक उपचार करत सर्पदंश झालेल्या युवकाला डिस्चार्ज दिला. मात्र सर्पमित्रांची धडपड व प्रयत्नामुळे सदर युवक व साप या दोघांचे प्राण वाचले आणि नागरिकांनी सर्पमित्रांचे आभार मानले.