दौंड : दौंड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊ ते रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लिंगाळी गावच्या हद्दीत मंगेश मेमोरियल हायस्कूल समोरील मोकळ्या जागेत घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अमोल सुभाष साळुखे (वय-33, रा. बोरावके नगर, दौंड) असं खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अमोल यांच्या पत्नी तेजश्री अमोल साळुखे यानी दौंड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवत पोलिसांनी मयत अमोल याचा व्यावसाविक भागीदार महेश गणेश काळे (वय-33, बोरावकेनगर, गोपाळवाडी, दौड मूळ, रा. अजनुज, श्रीगोंदा) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल हे रात्री साडे दहा वाजेपर्यंत घरी परतले नाहीत. म्हणून पत्नी तेजश्री व मामा त्यांचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांना लिंगाळी हद्दीतच ते आपल्या कारमध्ये जखमी अवस्थेत आढळले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
व्यवसायाच्या भागीदारीतून बाहेर काढण्याच्या संशयावरून खून
मृत अमोल व आरोपी महेश काळे दोन व्यवसायात भागीदार होते. मागील दोन वर्षात त्यांनी या व्यवसायातून 30 ते 40 लाख रुपयांचा नफा कमविला होता. दोघे व्यवसायासाठी नवीन जागाही घेणार होते. दरम्यान, अमोल हा आपल्याला भागीदारीतून बाहेर काढणार असल्याचा महेश याला संशय आला होता. याच रागातून त्याने अमोल याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करीत खून केला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी सहा पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, परिसरातील सीसीटीवी फुटेजच्या माहितीवरून आरोपीला दौंडमधून ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.