पिंपरी : खेड तालुक्यातील रासे फाटा येथे स्टेटसला लाइक करून फोटो शेअर केल्याने तरुणाचा खून केल्याची घटना घडली. खून झालेल्याचा फोटो १८ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवला. या रागातून अपहरण करून त्याचाच खून केला. ही घटना रासे फाटा येथे मराठा हॉटेलमध्ये घडली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तपास करत खून प्रकरणाचा उलघडा केला. आदित्य युवराज भांगरे (१८, रा. भांगरे वस्ती, महाळुंगे, ता. खेड), असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा हॉटेलचा मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर हॉटेलमध्ये घुसून काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाला. याप्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर अमर नामदेव शिंदे (२५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला २३ मार्च रोजी अटक केली. यातील मुख्य संशयित आरोपी राहुल पवार अद्याप फरार आहे.
नेमकं प्रकरण काय?
राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा तीन महिन्यांपूर्वी खून झाला होता. त्या गुन्ह्यात स्वप्नील शिंदे याचा सहभाग असल्याचा संशय राहुल पवार याला होता. त्यामुळे त्याने अभिजित सदानंद मराठे (रा. कोथरूड, पुणे) आणि इतर साथीदारांसोबत मिळून स्वप्नीलवर गोळीबार केला. मात्र त्यापूर्वी दोन दिवस अगोदर म्हणजेच १६ मार्च रोजी संशयितांनी आदित्यचा खून केला असल्याचे उघडकीस आले.
राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो सोशल मीडियावर काही जणांनी शेअर केले होते. त्याला लाइक करून आदित्य भांगरे याने ते फोटो स्टेट्सला ठेवले. त्या रागातून राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून आदित्यचे चारचाकी वाहनामधून अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करून वायरने गळा आवळून त्याचा गाडीमध्येच खून केला. आदित्य बेपत्ता झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल होती.
दरम्यान, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी संशयितांनी आदित्य भांगरे याचा खून करून त्याचे पुरावे नष्ट केले. मात्र संशयितांनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर नेला. सीमेवरील गुजरातमधील वेलवाडा येथे जंगल परिसरात मृतदेह जाळला. पोलिसांनी तेथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह ओळख पटविण्याच्या अवस्थेत नसल्याने डीएनए तपासणी होणार आहे.