शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील एका कंपनीमध्ये एचआरकडे तक्रार करण्यासाठी गेलेल्या युवकाला एचआरच्या केबिनमध्ये अनाधिकाराने प्रवेश करुन बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत अधिकराव शिवाजीराव पाटील (वय २९, रा. नक्षत्र सोसायटी वाघोली ता. हवेली जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अक्षय विजय काळे (रा. पिंपळसुटी इनामगाव ता. शिरुर) यासह सात अनोळखी युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
युकेबी कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकराव पाटील याच्याबाबत अक्षय काळे काहीही अफवा पसरवत असल्याने पाटील हा त्याबाबत तक्रार करण्यासाठी एचआर यांच्या केबिनमध्ये गेलेला होता. दरम्यान एचआर सोबत चर्चा करत असताना अक्षय हा त्याच्या काही साथीदारांसह कंपनीच्या भिंतीवरुन अनाधिकाराने प्रवेश करुन एचआर यांच्या केबिनमध्ये आला. दरम्यान सर्वांनी पाटील यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी काठीने मारहाण करत जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार विजय सरजिने हे करत आहेत.