पिंपरीः निगडी येथील दुर्गा टेकडीवर नेऊन १५ वर्षीय मुलीवर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पिडीत १५ वर्षीय तरुणीच्या आईने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम (वय २२ ते २५ वर्ष, रा. ओटास्कीम, निगडी) आणि १५ वर्षीय मुलीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचारासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
पिडीत मुलगी घरात एकटी असताना ‘तू माझ्यासोबत दुर्गा टेकडी येथे चल. नाहीतर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारून कुटुंब संपवून टाकीन’ अशी सलीम याने धमकी दिली. तिला बळजबरीने दुर्गा टेकडी येथे नेले. तिथे काही अंतरावर पिडीत मुलीची १५ वर्षीय वर्ग मैत्रीण थांबली. सलीम याने मुलीवर तीन वेळा लैंगिक अत्यचार केला.