पुणे: पीएसआय पदाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १ मे २०२२ ते ४ माचे २०२५ दरम्यान घडला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने महादेव बाबुराव दराडे असे आरोपीला शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणाला पीएसआय पदाची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्याच्याकडून १० लाख रुपये घेतले आणि तरुणाची फसवणूक केली. पोलिसांनी सांगितले की,आरोपीने नोकरी देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांना फसवले आहे. या प्रकरणी तरुणाने बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
आरोपी महादेव दराडे हा मुळचा धाराशिव येथील असून वाकड येथे रहात होता. दरम्यान, आरोपी रिअल इस्टेट एजंटसह जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित कामे लोकांना करुन देत होता. जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आरोपी आणि तरुणाची ओळख झाली होती.
पोलिसांनी आरोपीला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली अटक केली आहे. आरोपीने फसवणुक केल्याची ही पहिलीच वेळ नाही. लोकांना नोकरी किंवा इतर फायदे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचा त्याचा इतिहास आहे, असे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करीत आहेत.