शिक्रापूर : येथील पुणे-नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथे चार दिवसांपूर्वी पाण्याच्या टँकरखाली कार शिरुन झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, त्याच ठिकाणी कंटेनरला धडकून दुचाकीवरील आकाश साहेबराव गेजगे हा ठार, तर त्याचा साथीदार बंडू बाळासाहेब गोते हा जखमी झाल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत महेंदर यादव या कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.

पुणे-नगर महामार्गावरून आकाश गेजगे व बंडू गोते हे दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चाललेले असताना बजरंगवाडी येथे पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चाललेल्या कंटेनर चालकाने अचानकपणे पुन्हा पुणे दिशेने वळण घेतल्याने कंटेनरच्या मागील बाजूस दुचाकीची दुचाकीची धडक बसली. या अपघातात आकाश गेजगे (वय ३३ रा. पेरणे फाटा ता. हवेली जि. पुणे मूळ रा. सुरळवाडी ता. गंगाखेड जि. परभणी) यांचा मृत्यू झाला. तर बंडू गोते (वय ५० रा. पेरणे ता. हवेली) हे जखमी झाले असून याबाबत राजाभाऊ सखाराम गेजगे (वय २८ रा. शिक्रापूर ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी रणजीत महेंदर यादव (वय २५ रा. जि. आजमगड उत्तरप्रदेश) या कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







