पारगाव (पुणे): आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील कार्तिक विष्णू विधाटे (वय २१ वर्ष) या तरुणाला क्रिकेट खेळताना दम लागल्याने तो घरी जाऊन झोपला असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवार सात जुलै रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. कार्तिक याचा मृत्यू हृदय विकाराचा झटका आल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेवर चालक असलेले विष्णू विधाटे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. सहा महिन्यांपूर्वीच मुलीचे लग्न झाले आहे. त्यांना कार्तिक हा एकुलता एक मुलगा होता. परंतु, तरुण वयातच एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने विधाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर धामणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कार्तिक विधाटे हा पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे खासगी कंपनीत काम करत होता. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी तो कामानिमित्त धामणीला आला होता. रविवारी सात जुलै रोजी गावातील मित्रांबरोबर तो क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी क्रिकेट खेळताना त्याला दम लागला. त्यानंतर तो दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घरी आला आणि त्याच्या खोलीत जाऊन झोपला.
त्यानंतर अर्ध्या तासाने कार्तिकची आई अलका विधाटे या त्याला उठवण्यासाठी गेल्या असता तो उठला नाही. त्यावेळी कार्तिक कुटुंबीयांनी पारगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून पुढील उपचारासाठी इतरत्र हलवण्यास सांगितले. त्यानंतर कार्तिक याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी कार्तिकला तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले. कार्तिक याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.