पुणे : तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, या मागणीसाठी प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने आज गुरूवारी पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्याशिवाय, एमपीएससी परीक्षेतील जागा वाढविण्याची मागणीही करण्यात आली.
लाक्षणिक उपोषणाची परवानगी यावेळी मागण्यात आली. मात्र, परवानगी मिळाली नसल्याने युवक कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेत घटनास्थळी आंदोलन केले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांचा मोठा फौडफाटा करण्यात आला होता.
‘तलाठी भरतीच्या निकालात पुन्हा गोंधळ झाला आहे. मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे वारंवार समोर आले आहे. यामुळे प्रामाणिकपणे वर्षोनुवर्षे अभ्यास करणाऱ्या स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी होत आहे.’ असे म्हणत प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी संपात व्यक्त केला.
तर, ‘स्पर्धा परीक्षा गांभिर्याने घेत सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. सरकारच्या ढिसाळ व भ्रष्ट कारभारा विरोधात परीक्षार्थींना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. युवक कॉंग्रेस विद्यार्थ्यांसाठी राज्यभर हा लढा लढणार आहे.’असे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी म्हटले.