अमोल दरेकर
सणसवाडी: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शुक्रवारी (दि.८) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
मुरलीधर पितळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सणसवाडी येथील मुरलीधर हा आपल्या पत्नी, दोन मुलींसह चेरअमन वस्तीवर भाड्याच्या खोलीत गेल्या पाच वर्षांपासून राहत होता. मुरलीधर याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. सकाळचे धुके दाट असल्याने परिसरात येणाऱ्या-जाणाऱ्यांना मुरलीधर पितळे याचा मृतदेह दिसला नाही. मात्र, धुके कमी झाल्यावर काही ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी मुरलीधरचा मृतदेह खाली उतरवत एका खासगी वाहनाने शिक्रापूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मुरलीधर याने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.