पुणे : उसणे घेतलेले पैसे परत न केल्याच्या कारणावरून तरुणाला ‘चोर चोर’ म्हणून चिडवलेले सहन न झाल्याने या तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली होती. मुलाच्या आई-वडिलांनी तगादा लावल्यानंतर पर्वती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण जाधव (वय २४, रा. पानमळा, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर कार्तिक राजेंद्र हुलवाळ (वय ३०, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता), निमिष वनराज महाडीक (वय २९, रा. यशलक्ष्मी निकेतन), अक्षय हरिश्चंद्र उभे (वय ३१, रा. समर्थनगर, सिंहगड रस्ता) आणि प्रकाश माने (वय ३०, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी करणची आई नंदा जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण याने प्रकाश माने नावाच्या त्याच्या मित्राकडून उसने पैसे घेतले होते. हे पैसे घेऊन त्याने पुढे अक्षय उभे याला दिले होते. बरेच दिवस झाल्यानंतरही उभे हे पैसे परत करीत नव्हता. यासोबतच त्याचे अन्य मित्र हुलवाळ, महाडीक आणि माने हे देखील त्यामध्ये सामील होते.
मागूनही उभे पैसे देत नसल्यामुळे करण याने उभेची एक मोटार स्वत:कडे ठेवून घेतली होती. ही मोटार एक दिवस माने घेऊन गेला होता. त्यानंतर, करण याने सांगितलेल्या जागेवर पुन्हा ती मोटार लावून किल्ली त्याने करणकडे परत दिली होती. दरम्यान, ही मोटार त्याठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर करणने याबाबत मानेकडे चौकशी असता माने याने गाडी परत दिल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उभे यानेच ही कार नेल्याचे समोर आले. त्यानंतर चिडलेल्या माने याने करणला ‘चोर चोर’ असे चिडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर आरोपी देखील करणला चिडवू लागले. या गोष्टीमुळे त्याला मानसिक त्रास लागल्याने त्याने घरामधून बाहेर पडणे बंद केले. तसेच, तो कायम मानसिक तणावात असे. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरी गळफास घेत आपल्या आपले जीवन संपवल्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील जगदाळे हे करीत आहेत.