कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. चे शिरूर) येथील वाडा पुनर्वसन येथील एका ३५ वर्षीय तरुणाने ऑनलाईन गेमचे पैसे मिळत नसल्याने व मित्रांकडील उसने पैसे परत करता न आल्याने नैराश्यापोटी गळफास घेत आत्महत्या केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किशोर सुरेश पाटील (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अतुल सुरेश पाटील (वय३५ रा. वाडा पुनर्वसन, नक्षत्र हौसिंग सोसायट) येथे पत्नी व दोन मुलींसह राहण्यास आहे.
३१ मे रोजी रात्री १०:३० वा. सुमारास फिर्यादी कामावरून घरी आले असता, अतुल फोन उचलत नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर फिर्यादी पाटील यांनी फोन केला. परंतु, त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याचा शेजारी रामकरण कुमावत याला फोन केला व त्याला त्याच्या रूमला जायला सांगितले. त्याने त्याचा दरवाजा खुप वेळा वाजविला. परंतु, अतुल याने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता अतुल पाटील याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहेत.