पुणे : कामावरून काढून टाकल्याच्या तणावातून एका कामगार तरुणाने बोपोडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी खासगी कंपनीतील व्यवस्थापकाविरुद्ध शनिवारी (दि. २०) गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल प्रमोद साळवी (वय ३०, रा, बोपोडी) हे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साळवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन खासगी कंपनीचे व्यवस्थापक झीशान हैदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत साळवी यांची बहीण प्रीती यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल येरवड्यातील कॉमर झोन परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला होता. कंपनीचा व्यवस्थापक झीशान हैदर याने विशाल कंपनीतील कामगारांसमोर अपमानित केले. कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती. विशाल यांना कामावरुन कमी करण्यात आल्याने तो नैराश्यात गर्तेत सापडला होता. त्याने २१ जून २०२४ ला बोपोडीतील नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विशालने सोशल मीडियावर चिठ्ठी आणि झीशान हैदरचे छायाचित्र प्रसारित केले होते. यासंदर्भात प्राथमिक तपासानंतर झिशान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.