लोणी काळभोर : गेल्या सहा महिन्यांपूर्वी वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली असतानाच, आता मुलानेही राहत्या घरात साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतजवळ बुधवारी (ता.३१) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वडिलांच्या पाठोपाठ मुलानेही आत्महत्या केल्याने कुंजीरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
सनी हनुमंत गावडे (वय-२२, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश हनुमंत गावडे (वय-२५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. तर सहा महिन्यांपूर्वी गणेश यांचे वडील हनुमंत खंडू गावडे (वय-४३) यांनीही आत्महत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सनी गावडे हा बेरोजगार होता. तसेच त्याला दारूचे व्यसन मोठ्या प्रमाणात लागले होते. दरम्यान, बुधवारी सकाळी गणेश गावडे याला त्याचा भाऊ सनी हा घरात गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती गणेश यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे, सुवर्णा गोसावी, पोलीस हवालदार महेश करे, घनशाम आडके व पोलीस पाटील मिलिंद कुंजीर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सनी गावडे याचा मृतदेह खाली उतरविला आणि शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवला आहे. सनी गावडे यांने आत्महत्या का केली? याचे करण अद्याप समोर आले नसले, तरी पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपूर्वी सनीचे वडील हनुमंत गावडे यांनीही आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. तेवढ्यातच मुलगा सनी गावडे यानेही आज आत्महत्या केली आहे. पिता-पुत्रांच्या आत्महत्येमुळे कुंजीरवाडी गावावर शोककळा पसरली आहे. तर गावडे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.