पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने घटस्फोट व पोटगीसाठी दाखल केलेला दावा, असं असताना एका मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दाखल केलेला पोस्कोचा गुन्हा याच्या दबावाखाली एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना ९ ऑगस्ट रोजी बिबवेवाडी येथील राहत्या घरात घडली. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यामध्ये पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.
तेजस तानाजी चाळेकर (वय-२७, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तरुणाची आई शिला तानाजी चाळेकर (वय-४७, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शितल विजय पिंगळे (सर्व रा. पौड, ता. मुळशी) ऋषीकेश ऊर्फ भाई सुनिल खेडकर, सुनिल शिवलिंग खेडकर, भूषण सुनिल खेडकर (रा. नसरापूर, ता. भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस आणि ऐश्वर्या यांचा विवाह झाला होता. त्यांचे सतत भांडण होत असल्याने ते वेगळे राहत होते. तेजस याचा व्यवसाय होता. तेजस याच्या पत्नीने घटस्फोट आणि पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. तेजस हा ९ ऑगस्ट रोजी घरात मध्यरात्रीच्या सुमारास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, तेजसने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत सासरकडील लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आशय पोलिसांना मिळाला आहे. तेजस याच्यावर पोस्को अतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे तो दबावाखाली होता. सहायक पोलीस निरीक्षक नकुंभ तपास करीत आहेत.