पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. सिरम कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तब्बल १ लाख ११ हजार रुपये घेऊन बनावट अपॉइंटमेंट लेटर देऊन तरुणाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना २०२२ ते २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडली आहे.
या प्रकरणी कोंढव्यातील ३७ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा दत्तात्रय सुतार (वय-२८, रा. वक्रतुंड सोसायटी, बनकरनगर, धायरी) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची खूप दिवसांची ओळख आहे. कृष्णा सुतार याने हडपसर येथील सिरम कंपनीत ओळख आहे, असे फिर्यादी यांना सांगितले. तुम्हाला सिरम कंपनीमध्ये एच.आर. ह्युमन रिसोर्सेस या पदावर नोकरीला लावतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून तब्बल १ लाख ११ हजार रुपये एवढी रक्कम घेतली.
दरम्यान, फिर्यादी यांना सिरम कंपनीचे बनावट अपॉइंटमेंट लेटर तयार करुन दिले. फिर्यादी हे पत्र घेऊन सिरम कंपनीत गेले. त्यावेळी त्यांना हे लेटर बनावट असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी सुतार याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाली ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर करीत आहेत.