शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथे किरकोळ कारणातून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत योगेश भालचंद्र धमण (वय १९ रा. कल्याणी फाटा, कोरेगाव भीमा ता. शिरुर, जि. पुणे) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकी बाळासाहेब हरगुडे (रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सणसवाडी येथील सरकारमान्य ताडी दुकानाच्या बाजूला योगेश धमण हा लघुशंकेसाठी गेलेला असताना विकी हरगुडे याने योगेशला बोलावून घेत इकडे कशाला आला असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत लाकडाने मारहाण केली. दरम्यान योगेशचा मित्र राहुल सोनवणे हा त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेला असता विकी याने त्याला देखील दमदाटी करत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वेरणनाथ मुत्तनवार हे करत आहेत.