पुणे : सोसायटीतील सभासदांना जमवून अडवणूक करत, कॉमन पार्किंग, टेरेस व मेन्टनन्सचा वापर करण्यास नकार दिला. तसेच जातीवाक शिवीगाळ करुन काठीने, चप्पलने व हाताने बेदम मारहाण केल्याने घाबरलेल्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. हा प्रकार सिद्धी अपार्टमेंट व बकोरी फाटा येथे १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंतच्या वेळेत घडला. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह १५ जणांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने लोणीकंद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी सचिन जाधव (वय ३९, रा. गोकुळ पार्क, वाघोली), गजानन आबनावे, लता गजानन आबनावे, संग्राम आबनावे, सायली आबनावे, डॉ. पाचारणे व इतर ९ (सर्व रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली) जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. तर सचिन जाधव हे सोसायटीचे बिल्डर आहे. जाणीवपूर्वक त्यांनी दलितांना फ्लॅटची विक्री केली. दलितांना फ्लॅटची विक्री केली की त्यांच्या गरीबीचा फायदा उठवून त्यांना फ्लॅटमधून बाहेर काढणे सोपे जाईल, या उद्देशााने फिर्यादी व त्यांचा भाऊ यांना जातीवाचक शिवीगाळ केली. सोसायटी मेंबर्सनी जमून त्यांची अडवणूक केली.
एवढ्यावरच न थांबता, या सर्वांनी मिळून ते राहत असलेल्या सोसायटीमधील कॉमन पार्किंग, टेरेस व मेन्टनन्सचा वापर करण्यास नकार दिला. फिर्यादीच्या भावाला जातीवाक शिवीगाळ करुन काठीने, चप्पलने व हाताने बेदम मारहाण केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीच्या भावाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील करीत आहेत.