पुणे : पुण्यातील एरंडवणे येथील गणेशनगर परिसरात सुपारी घेण्यास नकार दिल्यामुळे तीन आरोपींनी एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना २४ ऑगस्ट रोजी शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी मनोज दत्तात्रय येनपूरे (वय-२४, रा. गणेशनगर, एरंडवणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी निखिल अंकुश गिरी, विकास ज्ञानेश्वर नलावडे आणि सचिन पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री दहा वाजता हातगाडीवर कुल्फी खात थांबले होते. त्यावेळी त्यांना ओळखणारे तीन आरोपी त्याठिकाणी आले. आरोपीने फिर्यादीला त्यांच्या सांगण्यानुसार कोणाला तरी जीवे मारण्याची सुपारी घेतो का असे विचारले. तेव्हा फिर्यादीने नकार दिल्यामुळे, आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून एका पडीक घरामध्ये घेऊन गेले.
दरम्यान, तिथे त्यांनी मनोजला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. तसेच स्क्रु ड्रायव्हरने आणि विटेने हल्ला केला आणि त्याला गंभीर जखमी करण्यात आले. एवढेच नाही तर बिअरची बाटली फोडून ती फिर्यादीच्या गळ्याला लावून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित करत आहेत.