पुणे : व्हॉट्सअॅपच्या डीपीवर ‘तू कुत्ता है’ असा डीपी ठेवणाऱ्या मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या १९ वर्षीय तरुणावर कोयताधारी टोळक्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वजण गाड्यांवर निघून गेले. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरिफ ऊर्फ तालीम आसमहंमद खान (वय २३), साहिल खान (वय २०), टप्पू खान (वय १९), अयान आरिफ शेख (वय १९), गुलाम गौसखान (वय २२, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाची नावे आहेत. याबाबत समीर इक्बाल शेख (वय १९, रा. गल्ली नंबर २८, सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ तारखेच्या रात्री साडेबाराच्या सुमारास फिर्यादी व मित्र अयान इरफान शेख, अस्लम, फरदीन असे गल्ली नंबर २८ येथे बोलत थांबले असताना मुख्य आरोपी तालीमसह त्याचे साथीदार टोळके तेथे आले. आरोपी तालीमचे आणि फिर्यादीच्या एका मित्राचे पूर्वीपासूनचे वाद होते.
तसेच व्हॉट्सअॅपवर फिर्यादीने ‘तू कुत्ता है’ असा डीपी ठेवल्याच्या रागातून तालीम आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने समीर शेखवर वार करत खुनाचा प्रयत्न केला. काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.