हडपसर : हडपसर व चंदननगर या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.1) घडली होती. हा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी 12 तासाच्या आत हांडेवाडी परिसरातुन अटक केली आहे.
बाळु कांधळे असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तसेच राहुल काळे (वय ३९ रा. मगरपट्टा हडपसर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर शुभम काकासाहेब निचळ (वय २७ , रा. समर्थ बैठक हॉल समोर, होळकरवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम निचळ याने जुन्या वादाच्या कारणावरून राहुल काळे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना आरोपी हा हांडेवाडी परिसरात येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी शुभम निचळ यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, खराडी येथे त्याच्या ओळखीचे इसम बाळु कांधळे यास धारदार शस्त्राने मारून खुन केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात ३०२ अन्वये गुन्हा नोंद असल्याचे व त्यातील संशयीताच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नमुद आरोपी दिसत असल्याचे समजले.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, अमोल दणके, चंद्रकांत रेजीतवाड, अमित साखरे, कुंडलीक केसकर, रामदास जाधव यांच्या पथकाने केली कामगिरी केली आहे.