पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल धमकीचा संदेश सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एकाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. शुभम वरकड (१९ वर्षीय) याला मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. आरोपी मूळचा नांदेड येथील रहिवासी आहे. तो सध्या पुण्यामध्ये राहतो.
वरकड हा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्सचे (बीसीए) शिक्षण घेत आहे. तो प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून या धमकीमागचा त्याचा हेतू तपासला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभय नावाच्या व्यक्तीने ११ फेब्रुवारी रोजी एक्सवर एक पोस्ट लिहून म्हटले होते की, “मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे. मी गुंडगिरी सुरू करण्याचा विचार करत आहे. माझ्याकडे थोडासा अनुभव आहे. या पोस्टला वरकडने स्वत:च्या अकाऊंटवरून रिप्लाय देताना म्हटले आहे की, “बंदूक मी आणून देतो, पण पहिला गेम एकनाथ आणि श्रीकांत यांचाच कर.”
ही पोस्ट पाहिल्यानंतर पोलिसांना एक तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले. त्याची पडताळणी केली असता हा प्रकार गंभीर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे तत्काळ संबंधित आरोपीचा जीमेल आयडीशी जोडलेला आयपी अॅड्रेस आणि त्याचा मोबाइल नंबर आणि त्याचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यात धाव घेऊन वरकड याला बेड्या ठोकल्या.
चौकशीदरम्यान वरकड याने धमकीचा मेसेज एक्सवर टाकल्याची कबुली दिली. शुक्रवारी त्याला मुंबईत आणण्यात आले आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५ (सार्वजनिक उपद्रव) आणि ५०६ (२) (धमकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखा युनिट ९ कडे वर्ग करण्यात आले आहे. वारकड यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या आधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत धमकीच्या पोस्ट करण्यात आल्या होत्या.