पुणे : मुंबई बंगळूर महामार्गावरच्या नवले पुलावरून एका २४ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क असणाऱ्या नागरिकांना व तत्पर वहातुक पोलिसांना या महिलेचे प्राण वाचविण्यात यश आले. हा सगळा प्रकार रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ८ च्या सुमार ही तरुणी मुंबई बंगळूर या महामार्गावरून आरडाओरडा करत जात होती. ही महिला नवले पुलावर थांबून उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रकार नवले पूल येथे वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या लक्षात आला. तातडीने वाहतूक पोलिस मिथुन राठोड व अमर कोरडे यांनी तिला उडी मारण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती महिला ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती.
सतर्क असलेल्या काही नागरिकांनी सतरंजी घेऊन आले. दरम्यान अनेक बघे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली. शेवटी महिलेने नवले पुलावरून उडी मारली. मात्र वाहतूक पोलीस व सतर्क नागरिकांनी त्या महिलेल्या सतरंजी व हातांच्या साहाय्याने पकडण्याचा प्रयत्न केला.
मात्र उंचावरून पडल्याने महिलेला किरकोळ दुखापत झाली. महिलेला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रेम प्रकरणातून तरुणीने हे धाडस केले असल्याची माहिती समोर येत आहे.