पुणे : पुणे पोलिसांनी थेट गोव्यात जाऊन कारवाई केली आहे. मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला सहकारनगर पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनय मारुती शेकापुरे (वय २३, रा. गणेश कृपा मिरामार पणजी गोवा, मूळ रा. मु.पो मुखेड जि .नांदेड ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान, आरोपीने तरुणीला अश्लील व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडून त्याने तो कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचा राग मनात धरून व्हिडीओ फेक इन्स्ट्राग्राम आयडी बनवला. तसेच यूट्यूबवर लिंक बनवून समाजमाध्यमांवर प्रसारित केला. हा प्रकार पीडित मुलीच्या लक्षात येताच तिने सहकारनगर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
गुन्ह्याचा तपास करत असताना पीडित मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे, व्हिडीओ कुणी प्रसारित केला याबाबत काही माहिती नसताना देखील केवळ तांत्रिक विश्लेषण आणि माहितीच्या आधारे आरोपी हा गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीस असल्याची माहिती काढली. सहकारनगर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सोपान नावडकर, पोलिस अंमलदार अमोल पवार, नीलेश शिवतरे, सागर सुतकर आणि निखिल राजीवडे या पथकाने गोव्यातील विविध हॉटेलमध्ये शोध घेतला.
यावेळी आरोपी एका हॉटेलमध्ये कामाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून आरोपी कामावरून घरी जात असताना ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गोव्यातून त्याला सहकारनगर पोलिस ठाण्यात आणून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे करत आहेत.