पुणे : पुण्यात ट्रेनिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीशी डीप नेक व शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं असं म्हणत तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ८ मे ते १४ मे या दरम्यान कोथरूड येथील गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर येथे घडला. याप्रकरणी ट्रेनिंग सेंटरच्या मालाकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निगडी परिसरातील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महेश गंगाधर कनेरी (वय-५१, रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कनेरी याचे कोथरूड येथे गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पिडित तरुणी नोकरी करत आहे. मंगळवारी (ता. १४) फिर्यादी कामावर आल्या होत्या. त्यावेळी आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आली, आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डीप नेक व शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहीत नाही का? तसेच माझ्यासोबत बिझनेस मीटिंगसाठी हॉटेलमध्ये येशील का? दुसऱ्या मुली माझ्यासोबत येतात, पैशाची काही कमी पडणार नाही, असे म्हणत तिच्यासोबत अश्लील वर्तणूक करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन करिअर बाद करण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.