पुणे : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ववैमनस्य आणि अनैतिकसंबंधाच्या संशायावरून दोन व्यक्तींनी एकमेकांवर थेट कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करत त्याला जखमी केलं आहे. या घटनेत दोघेही रक्तबंबाळ झाले आहेत. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून दोघेही एकमेकांच्या जीवावर उठले आहेत, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून ही माहिती समोर आली आहे.
मिरेकर आणि धोत्रे हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मिरेकरला धोत्रेवर राग होता आणि त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने मिरेकरला रस्त्यात गाठून कोयत्याने वार केले. त्यानंतर धोत्रेने सुद्धा त्याच्या साथीदारांना बोलवून मिरेकरवर हल्ला केला. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांकडून तपास आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.