पुणे : पुण्यात कोयता गँगने दहशत पसरवण्यासाठी तोडफोड केल्याच्या घटनांमध्ये वाद होताना दिसत आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील उपाययोजना करत आहे. असं असताना देखील पुणे शहरातील गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोयत्याने हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हाणामारीत तरुण रक्तबंबाळ झाले आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या पुण्यामध्ये भांडणांत सर्रासपणे कोयत्याचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. दोन व्यक्तींच्या झालेल्या भांडणात भररस्त्यावर कोयत्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे दहशत पसरवण्यासाठी कोयत्याचा वापर सर्रासपणे केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साध्या भांडणात देखील कोयता वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पुण्यामध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यात वाहनांची तोडफोड, कोयत्याने हाणामारी झाल्याचे प्रकार सर्रासपणे समोर येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या घटना गर्दीच्या ठिकाणी, शाळकरी महाविद्यालयीन मुलांकडून घडत आहेत. अल्पवयीन मुलांच्या हातात कोयते दिसत आहेत. यावर अंकुश बसविण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.