पुणे : पुण्यात कोयता गँगने दहशत माजवली आहे. किरकोळ कारणांवरुन कोयता हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अशातच आता एका डॉक्टराने तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार बुधवारी 3 जुलै रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान वाघोली परिसरात घडला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रितेश बाफना असं हल्ला करण्यात आलेल्या तरुणाच नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितेश बाफना या तरुणाने डॉक्टर विवेक गुप्ताकडून व्याजाने पैसे घेतले होते. ते पैसे वेळेत परत न केल्याने जीवन रक्षक हॉस्पिटलचा डॉक्टर विवेक गुप्ता आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंडांनी तरुणाच्या घरात घुसून आई-वडिलांना शिवीगाळ केली.
त्यानंतर डिकॅथलॉन स्पोर्ट्स शोरूम समोर प्रितेश बाफणा याची गाडी अडवून गाडीवर दगड फेक केली, तसेच लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्यानी मारहाण केली. याबाबत प्रितेश लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आले असता आरोपींनी पोलीस ठाण्याबाहेर कोयत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
हडपसर परिसरात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
दरम्यान, हडपसर परिसरात टोळक्याकडून दहशत पसरविण्याचे प्रकार सुरूच आहेत. कोयता गँगने संकेत विहार सोसायटी परिसरात कोयते फिरवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. तसेच एका व्यक्तीवर कोयता उगारला. गुरुवारी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.