पुणे : शहर आणि परिसरात गुन्हेगारी वाढीस लागली आहे. छट पूजा करण्यासाठी पाण्याचा हौद बांधल्याच्या कारणावरून एकाला लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना नुकतीच हडपसर परिसरातील संकेत विहार येथे रविवारी (ता. १९) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या घटनेत दिनेश रामधार चौहाण (वय ३५, रा. डेरे कंपनीजवळ, हडपसर) हे जखमी झाले असून, त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. फिर्यादीवरून, आशुतोष संतोष तिवारी (रा. संकेत विहार, गल्ली क्र. १६, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत विहार येथे छट पूजा करण्यासाठी फिर्यादी यांनी पाण्याची टाकी बांधली आहे. दिनेश चौहाण हे रविवारी छट पूजा करत असताना आरोपी तिवारी त्याठिकाणी आला. पाण्याचा हौद बांधल्याचे कारण पुढे करून, त्याने फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करुन लाकडी बांबूने डोक्यात मारहाण केली.
दरम्यान, दोघांमध्ये कडाक्याचे वाद झाले. वाद सोडवण्यासाठी सुकई रामा कनोजीया यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने त्यांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले.
या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.