पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परिसरात एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अन्य धर्मातील तरुणीशी मैत्री ठेवू नये म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. याबाबत तरुणाने विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, सदर तरुण हा पुणे विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तो आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून दहा ते बाराजण त्या ठिकाणी आले आणि त्या दोघांना टोळक्यांनी अडवले. आपण एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत असं सांगत विद्यार्थी आणि त्याच्या मैत्रिणीकडे त्यांनी आधारकार्ड मागितले.
दोघांच्या धर्मांबाबत त्यांनी विचारणा करत तू लव्ह जिहाद करतोस का, असा तरुणावर आरोप करून, कार्यकर्त्यांनी तरुणीला बाजूला नेले आणि लव्ह जिहादबाबत तिचे समुपदेशन केले. तरुणाला धमकावून त्याच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. तुमच्या मुलाला घेऊन जा असं त्यांनी तरुणाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर दहा ते बारा जनांनी तरुणाला बेदम मारहाण केली.
तसेच धमकावून वसतिगृहावर घेऊन गेले. कपडे भर आणि निघून जा. परत येथे दिसता कामा नये अशी धमकी कार्यकर्त्यांनी तरुणाला दिली, असा आरोपही तरुणाने वसतिगृहप्रमुखांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असं विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले आहे.