पुणे : पुण्यात वर्षभरापासून ऑनलाइन टास्कच्या आमिषाने सामान्यांची फसणवूक करण्याच्या प्रकारात वाढ होताना दिसत आहे. अशातच आता ऑनलाइन टास्कच्या आमिषाने हडपसर भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमक काय घडलं?
पुणे शहरातील उपहारगृहांची माहिती देणारा मजकूर समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. या मजकुराला ऑनलाइन पद्धतीने दर्शक पसंती मिळवून देण्याचे काम केल्यास चांगले पैसे मिळतील, असं सांगून चोरट्यांनी तरुणाला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी त्याला लगेच १५० रुपये ऑनलाइन पद्धतीने त्याच्या बँक खात्यात जमा केले.
साडेसतरा लाखाची फसवणूक
पैसे मिळाल्यानंतर तरुणाचा विश्वास बसला. चोरट्यांनी पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविल्यास चांगले पैसे परताव्यापोटी मिळतील, असं सांगितलं. चोरट्यांनी वेळोवेळी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १७ लाख ७० हजार ३२६ रुपये घेतले. खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्याचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाकःल केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक भोसले करत आहेत.