पुणे : पुण्यातील वारजे परिसरातील एक तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्रणव कराड (वय-२२) असं बेपत्ता झालेल्या तरुणाच नाव आहे. प्रणव हा अमेरिकेत एका जहाजावर कॅडेट म्हणून काम करत होता. शुक्रवारी अचानकपणे त्याचा त्याच्या कुटुंबाशी संपर्क तुटला आणि तो बेपत्ता झाला. जेव्हा तो बेपत्ता झाला तेव्हा तो सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रवास करणाऱ्या टँकरवर तैनात होता. तरुणाचे कुटुंबीय त्याला शोधण्यासाठी भारतातील विविध सरकारी अधिकाऱ्यांची मदत घेत आहेत. तसेच मुलाच्या शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या घटनेने कराड कुटुंबीय चिंतेत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रणव हा विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वीच तो अमेरिकेत गेला होता. अमेरिकेत तो शिफ्ट डेस्कला काम करत होता. गेल्या 3 दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे. प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याचे वडील गोपाळ कराड यांनी सांगितले. गोपाळ कराड हे पुण्यात चालक म्हणून काम करतात.
प्रणवने पुण्यातील एमआयटीमधून नॉटीकल सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तो अमेरिकेतील कंपनी विल्हेल्मसेन शिप मॅनेजमेंटमध्ये काम करत होता. शुक्रवारी ५ एप्रिलला प्रणवच्या वडिलांना कंपनीतून तो हरवला असल्याचा फोन आला. त्यानंतर या संदर्भात शनिवारी ६ एप्रिलला मेल आला की सिंगापूर आणि इंडोनेशिया दरम्यान प्रणव जहाजातून बेपत्ता झाला आहे. मात्र, त्यानंतर कंपनीकडून काहीच माहिती दिली जात नसल्याचे गोपाळ कराड यांनी सांगितले.
पुढे बोलताना प्रणवचे वडिल म्हणाले कि, माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती देत नाहीये. मी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. आमची शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नसल्याचं प्रणवच्या वडिलांनी सांगितले. याबाबत कराड यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.